Thursday 13 April 2017

हरवलेली माणसं : सीरियल मधली आणि आजु-बाजूची

 पूर्वीच्या काही  मराठी - हिंदी टि. व्ही सिरियल्स किंवा अगदी फिल्म्स सुद्धा आपल्या रोजच्या जगण्याशी किती जवळच्या असायच्या. एकदा YouTube वर एक जुनी "नुक्कड" नावाची टि . व्ही सिरीयल  बघत होते. मला वाटतं  "नुक्कड" ऐंशीच्या दशकातली असावी ,  बहुतेक माझ्या जन्माच्या आधीचीच. सीरियल मधली पात्रं  म्हणजे त्यावेळच्या मुंबईतली चाळीत राहणारी , देशभरातून कुठून कुठून कामधंद्यासाठी मुंबईत येऊन राहिलेली साधिसुधी माणसं. वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या प्रांतातून आलेली. प्रत्येकाची भाषा वेगळी आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचा क्लास पण वेगळा. कोणी हात काळे करणारा मेकेनिक तर कोणी चांगलं कमावणारा व्यापारी, कोणी साधा चहावाला. त्यातच बऱ्यापैकी पगार असलेला पण  या सगळ्यांबरोबरच राहणारा कोणी नोकरदार आणि एखादी घरकाम करणारी बाई , एखादा बैंड वाला सुद्धा. नुक्कडमधली ही पात्र किती साधी होती   आणि तरीही ती मला  रंगीबेरंगी वाटली . त्यांना बघताना असं जाणवलं कि हल्लीच्या किंवा थोड्या पूर्वीच्या सीरियल मध्ये कुठे असतात अशी माणसं. आता आपण बघतो त्या सिरिअल्स मधली माणसं कोण असतात.. जुन्या अवंतिका मधल्या दीक्षित सरांसारखी शिक्षक, लेक्चरर , प्रोफ़ेसर वगैरे  असतात, किंवा हल्लीच्या "जुळून येती रेशिमगाठी " मधल्या आदित्य सारखी सी.ए असतात. किंवा  "काहे दिया परदेस" मधल्या गौरी सारखी बँकेत काम करत असतात. डॉक्टर - इंजीनियर असतात, थोड़ी वेगळी गोष्ट असेल तर  पत्रकार, वकील, डान्सर , रेडियो जॉकी , नट वगैरे असतात. गृहिणी तर असतातच, कॉलेजला जाणारी मुलं असतात. पण शक्यतो सगळे शिकलेले, सोफेस्टिकेटेड वगैरे. सगळीच एका ठराविक क्लास मधली. फ्लैट मध्ये किंवा बंगल्यामध्ये राहणारी, स्वत:ची  कार असणारी वगैरे  वगैरे.. मग "नुक्कड़" मध्ये धमाल करणारी ती बाकीची माणसं गेली कुठे? म्हणजे तो मेकानिक , चहावाला , पेपरवाला, कामवाली बाई, भाजीवाली , कचरावाला,ऑफिस मधला शिपाई , रिक्शावाले काका, वॉचमन , नाहीतर एखादी नर्स सिस्टर,किराणा दुकानदार,मॉल मधला सेल्स बॉय....असली सगळी माणसं सीरियल्स मधून कुठे गेली...हल्लीच्या सीरियल्स मधल्या सोफेस्टिकेटेड वगैरे पात्रांच्या गोष्टींमध्ये आता फारशी दिसत नाहीत ही माणसं. रिक्शावाले काका किंवा चाळीतल्या जुन्या घरात राहणारे रिटायर्ड वडील हे गोष्टींमध्ये तेव्हाच असतात जेव्हा त्यांच्या  मुलीची  किंवा मुलाची  एखाद्या श्रीमंत मुलाशी किंवा मुलीशी लव्हस्टोरी होणार असते.  कामवाल्या मावशी किंवा वॉचमन  गोष्टीत तेव्हाच असतात जेव्हा ती सिरिएल एखादी डिटेक्टिव / क्राइम / वगैरे सस्पेन्स वर आधारित असते. पण असं का व्हायला लागलं असेल? कुठे हरवली ही माणसं सीरियल मधली....

असो,...टी.व्ही सीरियल्स ची गोष्ट बाजूला राहु दे थोड़ा वेळ. पण माझ्या रोजच्या जगण्याच्या गोष्टीत तरी कुठे आहेत आता  ही  माणसं ? आठवायला गेलं तर फार तर मला आमच्या घरी मी लहान असल्या पासून  येणाऱ्या आजी आठवतात, रिक्षाने शाळेत सोडणारे काका आठवतात. अशी कितीतरी माणसं माझ्या ओळखीतूनही हरवलेयत. म्हणजे ती  आजूबाजूला आहेत,  माझं काम असतं त्यांच्याकडे, दिसतात ती. पण  आता मी त्याना पर्सनली ओळखत नाही, नावाने ओळखत नाही. त्यांचं घर कुठे आहे मला माहीत नसतं, घरी जाणं तर दूरच.
पण लहानपणी ही माणसं माझ्या रोजच्या गोष्टीतली पात्रं असायची. एखादे रिक्शावाले काका शेजारच्याच बिल्डिंग मध्ये राहत असायचे , घरी कामाला ज्या आजी यायच्या त्यांच घर माहीत असायचं , मी त्यांच्या घरी जाऊन  आलेले असायचे. फार नाहीतर यातल्या कुणाची तरी मुलगी माझी शाळेतली मैत्रीण असायची. अगदी  माझ्या वर्गात नसली तरी घरी येता जाता बस - रिक्षा मधली मैत्रीण असायची.

एकूण काय तर  मी लहानाची मोठी होता होता जी वर्षं गेली त्यात  ही सगळी आजु-बाजूची माणसं हरवलेयत। ... माझ्या रोजच्या जगण्याच्या गोष्टींतून  आणि टीव्ही सिरियल्सच्या गोष्टींमधूनही !