Tuesday 30 May 2017

One Day at a Time

या आधीचा पोस्ट लिहिला आणि थोड्याच दिवसांनी "नेटफ्लिक्स" वर "One Day at A Time" नावाची एक अमेरिकन  सीरियल पहायला मिळाली. अमेरिकेतल्या शहरात राहणाऱ्या मूळच्या क्युबा या देशीच्या असलेल्या एका बाईची आणि तिच्या कुटुंबाची ही गोष्ट ही सीरियल हलक्या फुलक्या रुपात विनोदी ढंगाने सांगते. मध्यमवर्गीय बाईची एकटीने घर सांभाळताना , मुलं  वाढवताना होणारी कसरत , त्यातून तिच्या घरात घडणाऱ्या गमती जमती ह्या सगळ्यांची गोष्ट ही सीरियल नावाप्रमाणे अगदी One Day at A Time.. सांगते. रोज नवा दिवस आणि नवी गोष्ट. ही बाई एक अनुभवी नर्स आहे. नवऱ्यापासून वेगळी राहतेय. दोन टीन एजर  मुलांची आई आहे. स्पॅनिश एक्सेंट मध्ये बोलणारी , आपल्या क्यूबन परंपरा आपण जपल्या पाहिजेत असं मानणारी , तिकडच्या आठवणीत रमणारी तिची वयस्कर आईसुद्धा तिच्या बरोबरच राहतेय. या बाइचा एक Single Mother म्हणून , बजेट वर घर चालवणारी मेहनती नर्स म्हणून , टिन एजर्स ची आई म्हणून आणि एक दुसऱ्या पिढीतली क्यूबन स्थलांतरित म्हणून....असा सगळ्या प्रकारचा तिचा स्ट्र्गल आणि त्यातून होणारी गंमत  असं सगळ खूप छान येतं सीरियल मध्ये. 
सहज म्हणून या सीरियल बद्दल नेटवर  शोधलं तर The New York Times मधला एक लेख वाचायला मिळाला. "नुक्कड़" किंवा इतर 80's मधल्या सीरियल बघताना जे जाणवलं होतं तेच या लेखातही म्हटलय. त्यांच  असं म्हणणं आहे कि अमेरिकेतही ७० च्या दशकामध्ये टी.व्ही सीरियल्स मध्ये अशा "Paycheck to Paycheck" किंवा आपल्या टर्म्स मध्ये "कट टू कट " बजेट वर जगणाऱ्या लोकांच्या गोष्टी असायच्या. पण नंतर जसजशी लोकांच्या उत्पनामधली दरी वाढत गेली तसतशी ही  "वर्किंग क्लास " मधली लोकं टी.व्ही. सीरियल्सच्या गोष्टींमधून दिसेनाशी झाली. त्यांनी पुढे असंही म्हटलय कि जाहिरातींचे दर अधिक असल्यामुळे कमी उत्पन्न असणारे दर्शक टी.व्ही. सीरियल्सकरिता कमी फायद्याचे आणि कमी महत्वाचे ठरत गेले. आणि मग सीरियल्स मध्ये "White Collar" पात्रं  आणि त्यांच्या गोष्टी याच अधिक करून दिसायला लागल्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी या "One Day at a Time" चं खूपच स्वागत केलंय. या सीरियलच्या निमित्ताने अमेरिकन लोकांनी आपल्यातील  वर्गाने , वंशाने वेगवेगळ्या असलेल्या लोकांना आणखी  चांगलं समजून घेण्याचा प्रयत्न करुया असंही या लेखात म्हटलंय. 

आपला देशतर पावलो पावली विविधतेने नटलेला आहे .. आपल्याकडे  असा एकमेकांचं  वेगळेपण समजून  घेण्याचा प्रयत्न होतोय का.. आपल्या रोजच्या  जगण्यात आणि रोज आपण घरा घरांतून बघतो त्या सीरियल्स मधूनही...?