Friday 19 April 2013

जाणीव


           काही माणसं, काही ठिकाणं, काही अनुभव आपल्याला आपल्याच मनाच्या काही कोपयांची जाणीव करून देतात....असे कोपरे जे आहेत हे ही पूर्वी कधी नीटसं जाणवलेलं नसतं.....काही माणसं, काही ठिकाणं , काही प्रसंग जेव्हा आपल्या मनाचे असे कोपरे उजेडात आणतात तेव्हा अचानक काही जाणीवा खूप ठळक होतात....इतक्या कि सगळीभर....रस्त्याने येता जाता....लोकांशी बोलताना.....पेपर वाचताना....बातम्या पाहताना.....सगळीकडे......जणुकाही कोणीतरी मला काही ठराविक गोष्टी मुद्दाम "बोल्ड" करून "हायलाईट" करून दाखवतंय असं वाटायला लागतं..... स्ट्रेंज! आजूबाजूचं जग तेच असतं जे मी पूर्वी पाहत असते, वाचत असते....पण आता मला त्याची काहीशी वेगळी ओळख होते....."बार्टी" मध्ये जॉईन झालेय तेव्हापासून माझ्या जगाचं असंच काहीसं "बोल्ड-हायलायटिंग" झालं असावं......थोडं भानावर आणणारं, खडबडून जागं करणारं, कधी कधी खूप अंगावर येणारं, आणि बयाचदा थोडं अपराधी वाटायला लावणारं......
एकूणच जातिव्यवस्थेच्या उतरंडीबद्दलची, माझा-जन्म-कुठल्या-घरात-झाला-यावर-माझं-स्थान-ठरणार याबद्दलची चीड तर मला कळायला लागलं तेव्हापासूनच होती.....मी ब्राह्मण नाही हे कधी आडनावावरून, कधी खाण्यापिण्याच्या सवयींवरून तर कधी आणखी कशावरून कळल्यानंतर होणारं Between the Lines Discrimination मी ही अनुभवलं होतंच....ते पूर्वी खूप चीड आणायचं...मग हळुहळु त्याचं नुसतंच वैषम्य वाटायला लागलं आणि आता आता तर लोकांच्या अशा वागण्याची नुसतीच कीव वाटते. पण अजूनही आपल्या आसपास , समाजात असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्या वाट्याला या जातिभेदाचा अनुभव असा नुसता Between the Lines न येता स्पष्ट ठळक अक्षरात येतोय, सारखा येत असतो....हे किती सिरियस आहे....ब्राह्मण घरात जन्म नाही झाला म्हणून तसं माझं तर फ़ार काही बिघडलं नाही कधी.....मागच्या पिढीपासून सगळ्यांना चांगलं शिक्षण मिळालं, आर्थिक स्थिती बरी होती, खया अर्थाने पुढारलेले विचार पोहोचले, शहरातलं एक्स्पोजर मिळालं त्यामुळे माझ्यासाठी आणि माझ्या समाजासाठी upward mobility  कितीतरी सोपी झाली. मी खूप नशीबवान ठरले खरंतर. पण अजून बराच मोठा समाज आहे ज्याला हे शक्य झालेलं नाहिये. अगदी त्या समाजातल्या माझ्या वयाच्या, माझ्या लहान भाऊ-बहिणीच्या वयाच्या मुलांनासुद्धा अजून यातलं काहीच मिळालं नाहीये. In fact, त्यांना तशी संधी मिळायला अनुकूल वातावरण व्हावं म्हणून माझ्यासारख्या घरातल्या लोकांनी पुरेसं काहीच केलं नाहिये. काही करणं तर सोडाच, पुरेशी जाणीवही नाहिये आपल्याला...आणि यात नक्की काहीतरी चुकतय.....Something is seriously wrong here...
आतापर्यंत मागासवर्गीय आणि दलित वगैरे म्ह्टलं तर एक डॉ. बाबासाहेब आंबेड्कर आणि त्यांच्या विषयीचा आदर वगळता आपल्या समाजाचा एक मोठा भाग म्हणून प्रातिनिधिक असं काय यायचं डोळ्यांपुढे तर.....एखाद्या राजकिय पक्षाचे होर्डींग, जयंत्यांचे फ़लक, त्यादिवशी चौकाचौकात चालणारा नाच-गाण्यांचा धिंगाणा...अडलेलं ट्रॅफ़िक....आणि या सगळ्यामुळे मनात येणारी थोडीशी तिरस्काराची थोडी दुर्लक्ष करावसं वाटण्याची भावना. पण वरकरणी बघता एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट अगदी क्षुल्लक, झिडकारून टाकावसं वाटणारी असली तरी काही वेळा आपण त्या गोष्टीची, त्या मागची "स्टोरी" समजून घेतली कि एकदम जाग झाल्यासारखं वाटतं, स्वच्छ दिसायला लागतं..तसं माझं याबाबतीत झालंय....अशा कुणाची स्टोरी समजून घेण्याची मला कधी संधी आली नव्हती म्ह्णा किंवा मीच कधी त्या फ़ंदात पडले नव्हते किंवा मला तशी कधी गरज वाटलीच नाही म्हणा.....बार्टी मध्ये जॉईन झाले आणि माझ्या या सगळ्या जाणीवा जाग्या करणारा अनुभव लवकरच आला. संस्थेने मेहेतर समाजाचा मेळावा आयोजित केला होता आणि तिथे जमलेल्या प्रतिनिधींकडून माहिती गोळा करायची , त्यासाठी मुलाखती घ्यायचं तसं छोटंच काम होतं.  अशा मुलाखती घेणं खरंतर इंटरेस्टिंग असतं....because you get to know the story of  people who are otherwise complete strangers to you.
मेहतर समाज म्हणजे मागासवर्गीयांमधला अजूनही सर्वांत मागास असलेला समाज. पूर्वीपासून माणसांची विष्ठा गोळा करणं, शौचालयं साफ़ करणं हेच काम करत आलेला हा समाज. आणि दुर्दैवाने अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे अजूनही या समाजातले बरेचसे लोक हेच काम करतात...सफ़ाई कामगार म्हणून. नगरपालिकांचे सफ़ाई कर्मचारी, कचरा गोळा करणारे, ड्रेनेज लाईनमध्ये उतरून स्वच्छता करणारे, गटारं साफ़ करणारे हे सगळे अजूनही याच समाजाचे लोक आहेत. त्यांच्या प्रश्नांबद्दळ थोडं अनिल अवचटांच्या लेखांमध्ये वाचलं होतं, थोडं अतुल पेठेंचा "कचराकोंडी" पाहिला तेव्हा कळलं. पण कधी या समाजातील कुणाशी त्यांच्या मेहतर समाजाचं असण्याच्या identity सकट सामोरं जायचा प्रसंग आला नव्हता. खरंतर मला थोडं टेन्शनच होतं कि माहितीसाठी मुलाखत घेताना माझं काही चुकणार तर नाही ना ...त्यांना न दुखावता काही कठीण प्रश्न विचारता येतील ना....मी आधीच ठरवलं होतं कि शक्यतो तरुण मुला-मुलींशी बोलायचं. कारण एकतर त्यांच्याबरोबर माझी Comfort Level जास्त असेल आणि मागासवर्गीय तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवणं हेच माझं काम असल्यामुळे मला थोडं समजूनही घेता येईल कि या मुलांना नेमकं काय मिळालं पाहिजे, कुठे आपण कमी पडतोय....वगैरे.
सध्या कॉलेज शिकणाया या सगळ्या मुलामुलींचे आई-वडील त्याच पारंपारिक कामात होते..शहरात सफ़ाई कामगार किंवा गावात मेहतरीचं काम करणारे. मला कल्पना असूनही का कुणास ठाऊक पचवायला जड जात होतं.   आपल्या आईला, बाबांना अजूनही हेच काम करावं लागतं हे ही मुलं किती सहज सांगत होती....म्हणजे उद्या जर यांना दुसरं योग्य काम नाही मिळालं तर ते सुद्धा झाडूच घेणार हातात. आई काय काम करते? असं मी विचारल्यावर, "मम्मी मेहतरी का काम करती है और क्या करेगी?" असं उत्तर देत थोडं आश्चर्यानेच माझ्याकडे बघणारा तो मुस्लिम मेहतर समाजातला १८-१९ वर्षांचा मुलगा. कदाचित मला लहान भाऊ असता तर आज त्याच्या एवढाच असता....दोन-तीन वर्षांनी हा बी.ए होईल. मराठ्वाड्यात त्याच्या गावाकडे कसली नोकरी मिळेल त्याला? नोकरी तरी मिळेल का?... नाही मिळाली तर...धंदा टाकण्याएवढे पैसे त्याच्या आईकडे नसणार. शेवटी तो काय करेल..कदाचित झाडू घेईल हातात....विचारानेच माझ्या अंगावर काटा आला.
इतकी वर्षं झाली आपल्या स्वातंत्र्याला पण अजूनही या लोकांना कुठे मिळालाय चॉईस? एकीकडे माझ्यासारख्या घरातली मुलं मुली आहेत कि ज्यांना त्यांच्या "चॉईस" साठी इंजिनीयरींग/मेडिकल सारखी सो-कॉल्ड उज्ज्वल भविष्य असणारी करियर सोडून आपल्या आवडीचं काम करण्याची चैन परवडू शकते आणि दुसरीकडे ही मुलं ज्यांना हे पारंपारिक काम सोडून दुसरं काही काम निवडण्याचा बेसिक पर्यायसुद्धा नाहीये. आपण ठेवलाच नाहीये.
या मुलापेक्षा थोड्या मोठ्या आणि बयाच मॅच्युअर्ड असेलेल्या दोघी बहिणी. वडिल पुणे महानगरपालिकेत सफ़ाई कामगार. आई वडील फ़ार न शिकलेलेच पण या दोघीजणी माझ्या प्रश्नांना उत्तर देताना कितीतरी विषयावर आपली प्रगल्भ मतं किती नीटनेटकी मांडत होत्या. आमच्या समाजातल्या मुलींनी कसं सुधारायला हवं, त्यांची लग्नं लवकर होता कामा नये, त्यांनी शिकायला हवं, व्यसनाधीनता कशी कमी व्हायला हवी इथपासून ते आपण शिकल्यावर समाजातल्या इतरांसाठी काहीतरी करावसं वाटतं, तसंच इतर प्राणिमात्र, निसर्ग यांना जपण्याची आपली जवाबदारी किती महत्त्वाची आहे इथपर्यंत.
तिचं बोलणं ऐकल्यावर मला वाटलं सगळ्याप्रकारे Advantage असलेल्या परिस्थितीत मोठं होऊन पैसा आणि स्टेटस देणारा जॉब मिळाला म्हणजे आपण खूप अचिव्ह केलं असं वाटून घेणारी आणि स्वत:च्या पलीकडे इतर सगळ्यांसाठीच्या जाणिवांना "ब्लॉक" करून जगणारी माझ्या  पिढीतली लोकं....ती "मागास" आहेत कि ही मुलगी?
माझं सगळं विचारून झाल्यावर तिलाही काही प्रश्न होते. मी पुढे काय शिकू, नोकरी कशी मिळवू, त्यासाठी काय करू, कुठे जाऊ? मला जमतील तशी मी तिला माहिती दिली, उत्तरं दिली. त्यावर तिने सांगितलं " मॅडम, असं आम्ही बाहेर कुणाला काही विचारलं तर नीट काही सांगत नाहीत हो. त्यांना जर माहित असेल आम्ही मेहतर आहोत मग तर मुळीच नाही." अशी वागणूक आपल्या पिढीतल्या मुलांनाही मिळत असेल अजूनही....मला खरंच वाटलं नव्हतं. थोड्या फ़ार फ़रकाने प्रत्येक मुलाची किंवा मुलीची ही अशीच किंवा यापेक्षाही कठीण "स्टोरी". ऐकून मनात खूप कालवाकालव झाल्यासारखं वाटत होतं. पण याच मेळाव्यात याच समाजातले काही स्वयंस्फ़ूर्तीने जमलेले अतिशय चळवळे, धडपडे लोक पाहिले. मेहतर समाजातले असूनही शपथ घेऊन झाडू हातात न घेणारे व जिद्दिने हॉटेल व्यवसाय करणारे, आपली पत्नी आपल्या पेक्षा अधिक शिकलेली उच्चशिक्षित असल्याचं अभिमानाने सांगणारे एक व्यावसायिक गृहस्थ, मेहतर समाजातल्या महिलांच्या प्रश्नांबद्दल पोटतिडिकीने बोलणारी, त्यांचं प्रतिनिधित्व करणाया जेमतेम २-३ महिलांपैकी असूनही धीटपणे आणि वेळप्रसंगी अग्रेसिव्ह होऊनही स्टेजवर बोलणारी, श्रोत्यांमधल्या काहींच्या हुल्लडबाजीला सामोरं जाऊन त्यांना काही कठीण प्रश्न विचारायचं धाडस करणारी एक महिला डॉक्टर, मुंबईतल्या वस्त्यांमधली मुलं शाळेतून गळू नयेत म्हणून आपल्या समाजातल्या उच्चशिक्षित तरुणांचा ग्रुप करून या मुलांसाठी कोचिंग क्लासेस घेणारा एक तरुण कार्यकर्ता. आणि असे इतर अनेक लोक जे त्यांच्या समाजाचे वेगवेगळे प्रश्न खूप पोटतिडकीने आणि अभ्यास करून मांडत होते. माझ्यासाठी हा सगळाच अनुभव खूप काही शिकवून जाणारा होता, वाटलं इतके दिवस हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचत का नव्हतं. मी थोडीफ़ार या क्षेत्राशी संबंधित असून जर इतकी अजाण होते तर माझ्या पिढीतल्या इतरांचं काय? म्हणजे त्यांना चौका-चौकात चित्रविचित्र गाण्यांवर नाच करून जयंत्या साजया करणाया समाजाची त्यांच्या आजच्या पिढीची खरी स्टोरी कधी कळणारच नाही का? "ते" आणि " आपण" ही दरी कायम अशीच राहील....."ते" आणि "आपण" कधी समोरासमोर मोकळं बोलून एकमेकांची स्टोरी समजून घेतील...? इंटरनेट -सोशल नेटवर्कींग ने जग जवळ आलं म्हणतो आपण पण अजूनही समाज म्हणून आपण किती लांब आहोत एकमेकांपासून?  प्रश्न अजूनही असाच मनात रेंगाळतोय आणि थोडं उदास वाटतंय़...मघाशी मी ज्याच्याबद्दल सांगितलं तो माझा मुस्लिम मेहतर समाजातला मित्र मला एक निरागस पण त्याने पाहिलेल्या वास्तवाला धरून असलेला एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता, " मैने होटेल मॅनेजमेंट का ट्रेनिंग लिया तो क्या सहीमें मुझे किचनमे शेफ़ का काम करने देंगे? सच्चीमे?" बरंच समजावल्यावर त्याला पटलं कि हे शक्य आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला आहे हा विश्वास पटायला त्याला थोडा वेळ लागला. आता त्याचा प्रश्न आठवून पुन्हा थोडं उदास वाटतंय....पण इतक्यात त्याने मला जाता जाता विचारलेला शेवटचा प्रश्न आठवतोय " आपके के फ़ॉर्म मे ना एकही प्रोब्लेम है, मेरे पास गाय कितना है, भैंस कितना हौ, मुर्गी कितना है सब पूछा है लेकिन मेरे पास २० प्यारे कबुतर हैं उन्के बारेमें लिखने को जगह ही नही रखा! वो भी लिखो! " अशी तक्रार सांगत मिश्किल हसणारा माझा मुस्लिम मेहतर समाजातला मित्र आणि त्याचा तो निरागसपणा आठवून मन पुन्हा हलकं वाटतंय...